प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर ह्या त्यांच्या अपंगत्व आणि ओबीसी दाव्यांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. खेडकर यांनी ह्याच दाव्याची प्रमाणपत्रे दाखवून नागरी सेवेत स्थान मिळवले होतं. केंद्राने स्थापन केलेल्या एक-व्यक्ती पॅनलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि खेडकर दोषी आढळल्यास त्यांना गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. (IAS Trainee Puja Khedkar’s Controversy)
सूची
चौकशीची दिशा
केंद्रीय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांच्या नेतृत्वाखालील पॅनल खेडकर यांनी त्यांचे अपंगत्व आणि ओबीसी स्थितीला समर्थन देणारी कागदपत्रे कशी मिळवली याची तपासणी करणार आहे. मुख्य तपास क्षेत्रांमध्ये कागदपत्रांच्या सत्यतेची पडताळणी, जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांद्वारे योग्य तपासणी झाली का आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय चाचणी का घेतली नाही याचा समावेश आहे.
संभाव्य परिणाम
खेडकर जर यात दोषी आढळल्यास तर राज्य सरकारकडून त्यांना बडतर्फ केले जाऊ शकते आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. खेडकर यांच्या ओबीसी स्थितीच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी DoPT पॅनल सामाजिक न्याय मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे.
आर्थिक परिस्थिती
खेडकर यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात येण्याचा दावा केला होता, परंतु त्यांच्या वडिल, माजी प्रशासकीय अधिकारी, यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात ४० कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे उघड केले आहे. यामध्ये खेडकर यांच्या नावावर नोंदवलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांचा समावेश आहे.
अपंगत्वाची तपासणी
खेडकर यांनी दावा केलेल्या दृष्टी आणि मानसिक अपंगत्वाची पडताळणी करण्यासाठी पॅनल AIIMS दिल्लीतील तज्ज्ञांशी संपर्क साधणार आहे.