मधमाश्या जवळून उडत असताना आपल्याला गूं गूं असा आवाज ऐकू येतो. इंग्रजीत याला ‘बझिंग साऊंड’ म्हणतात. हा आवाज त्यांच्या तोंडातून येतो असं आपल्याला वाटतं, जसं पक्ष्यांच्या आवाजाच्या बाबतीत होतं. पक्षी तोंडानं आवाज काढतात आणि त्यांचा आवाज ओळखण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी उपयोगात येतो. त्यामुळे आपण समजतो की मधमाश्याही संवाद साधण्यासाठी गुंजारव करतात. (Why Do Bees Buzz?)
पण प्रत्यक्षात, मधमाश्यांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. हा आवाज त्यांच्या पंखांच्या फडफडाटामुळे तयार होतो. जेव्हा मधमाश्या एकाच ठिकाणी स्थिर राहून मोहोळात काम करत असतात, तेव्हा हा आवाज ऐकू येत नाही. पण त्या उडायला लागल्यावरच हा आवाज ऐकू येतो. याचा अर्थ हा आवाज त्यांच्या पंखांच्या फडफडाटामुळे असावा.
सर्व उडणाऱ्या कीटकांना उडण्यासाठी पंखांची फडफड करावी लागते, ज्यामुळे हवेचे कंपन तयार होतात. हवेतील या कंपनांमुळे ध्वनी तयार होतो. कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग आणि त्या कंपनांची ऊर्जा यावर ध्वनीची तीव्रता अवलंबून असते. फुलपाखरांची पंखं उडताना कमी वेगानं फडफडतात आणि त्यामुळे त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. डासांच्या पंखांची फडफडणं जलद असतं, पण त्यांचे पंख लहान असल्यामुळे, त्यांचा आवाज आपल्याला कानाजवळ आल्यावरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख मोठे आणि जास्त वेगाने फडफडणारे असतात. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा पंख फडफडतात. त्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे हवेतील कंपन जोरदार असतात आणि त्यांचाच आवाज आपल्याला गुंजारवाच्या रूपात ऐकू येतो.