मराठी साहित्य क्षेत्रात आपली प्रतिभा आणि कर्तृत्वाने कधीही न मिटणारा ठसा उमटवणारे, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज, यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. त्यांच्या तेजस्वी शब्दांनी मराठी साहित्याला नवा चेहरा दिला. क्रांती, मानवता आणि प्रेम यांचा संदेश त्यांच्या लेखणीतून प्रखरतेने प्रकट झाला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. केवळ साहित्यच नव्हे, तर सत्याग्रह आणि सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. (Versatile Marathi Literary Genius Kusumagraj)
सूची
कुसुमाग्रजांच्या कविता
कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह ‘विशाखा’ त्यांच्या तेजस्वी कवितांमुळे खूपच लोकप्रिय ठरला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही वीररसपूर्ण कविता आणि ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात’ किंवा ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ अशा तरल कवितांनी वाचकांना मंत्रमुग्ध केलं. या संग्रहातील कवितांनी वाचकांवर प्रचंड प्रभाव टाकला. त्यांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या कवितेने तरुण पिढीला प्रेरणा दिली.
नाटकं आणि अन्य साहित्य
कुसुमाग्रजांनी अनेक नाटकं लिहिली आणि काही नाटकांचे रूपांतरही केले. ‘दुसरा पेशवा’, ‘आमचं नाव बाबूराव’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘नटसम्राट’ ही त्यांची स्वतंत्र नाटकं आहेत. ‘दूरचे दिवे’, ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘ऑथेल्लो’ आणि ‘बेकेट’ ही त्यांच्या रूपांतरित नाटकांत मोडतात. ‘नटसम्राट’ला ‘साहित्य अकादमी’चं पारितोषिक मिळालं.
कादंबऱ्या आणि कथासंग्रह
कुसुमाग्रजांनी कादंबरी लेखनातही आपली छाप सोडली. ‘वैष्णव’, ‘जान्हवी’, ‘कल्पनेच्या तीरावर’ या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कथासंग्रहांमध्ये ‘फुलवाली’, ‘काही वृद्ध काही तरुण’, ‘प्रेम आणि मांजर’, ‘निवडक बारा कथा’ यांचा समावेश आहे. त्यांनी कालिदासाच्या ‘मेघदूता’चं भाषांतरही केलं आहे.
अन्य साहित्य
कुसुमाग्रजांनी मुक्त काव्यसंग्रह ‘समिधा’, लघुनिबंध ‘आहे आणि नाही’ हे साहित्यही लिहिलं. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांनी लिहिलेला ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ हा फटका त्यांच्या सामाजिक निष्ठेचं प्रतिबिंब दाखवणारा आहे.
कुसुमाग्रजांच्या साहित्याने मराठी साहित्यात एक नवा प्राण फुंकला. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्य समृद्ध केलं. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वामुळे ते ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मानकरी ठरले. कुसुमाग्रजांच्या साहित्यामुळे मराठी साहित्यविश्वात त्यांचे स्थान नेहमीच उंच राहील.