Monday, December 23, 2024
Homeकुतूहलसमुद्राला भरती-ओहोटी कशी येते? (How sea tides occur)

समुद्राला भरती-ओहोटी कशी येते? (How sea tides occur)

चंद्रामुळे भरती-ओहोटी येते

समुद्राला भरती-ओहोटी का येते? (How sea tides occur) याचं उत्तर एका शब्दात देता येईल: चंद्रामुळे. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र नसता तर समुद्राला भरती-ओहोटीच्या चक्राला तोंड द्यावं लागलं नसतं. अवकाशातल्या प्रत्येक ग्रह ताऱ्याची गुरुत्वाकर्षणाची ओढ इतर सर्व ग्रह आणि ताऱ्यांना जाणवत असते. जशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ चंद्राला त्याच्या निश्चित कक्षेत फिरवते, तशीच चंद्राची गुरुत्वाकर्षणाची ओढही पृथ्वीला जाणवत असते. ती पृथ्वीला चंद्राच्या दिशेने खेचत राहते.

गुरुत्वाकर्षणाची तीव्रता आणि अंतर

गुरुत्वाकर्षणाच्या ओढीची तीव्रता दोन गोष्टींवर अवलंबून असते: त्या गोलांचं वस्तुमान आणि दोन गोलांमधलं अंतर. वस्तुमान जितकं जास्त, तितकी ओढही भारी. चंद्राचं वस्तुमान पृथ्वीच्या तुलनेत कमी असल्यामुळे त्याची ओढही कमी असते. आपली जमीन टणक असल्यामुळे त्या ओढीचा प्रभाव जमिनीवर फारसा पडत नाही; पण समुद्राचं पाणी लवचीक असल्यामुळे ते चंद्राकडे खेचलं जातं. त्याला त्या दिशेनं फुगवटा येतो, ज्याला आपण भरती म्हणतो.

चंद्राच्या विरुद्ध बाजूची ओहोटी

गुरुत्वाकर्षणाची ओढ अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते. चंद्र पृथ्वीच्या ज्या बाजूला असतो, त्या बाजूचं अंतर कमी असतं; पण विरुद्ध बाजूचं अंतर जास्त असतं. त्यामुळे विरुद्ध बाजूला गुरुत्वाकर्षणाची ओढ कमी होते. पृथ्वीच्या चंद्राच्या बाजूला असलेल्या ओढ आणि विरुद्ध बाजूच्या ओढ यांच्यामध्ये लक्षणीय फरक पडतो. त्यामुळे विरुद्ध बाजूचं पाणी चंद्रापासून दूर खेचलं जातं आणि त्या बाजूच्या पाण्यालाही फुगवटा येतो. म्हणजेच तिथंही भरती येते.

भरती-ओहोटीचं चक्र

दोन बाजूंच्या पाण्याला फुगवटा आला की त्याच्याशी काटकोन करून असलेल्या भागातलं पाणी ओसरल्यासारखं होतं. पृथ्वी स्वतःभोवती फिरत राहते, त्यामुळे पृथ्वीच्या निरनिराळ्या बाजू चंद्राच्या जवळ येतात किंवा दूर जातात आणि भरती येण्याची जागाही बदलत जाते. अर्धा दिवस उलटला की परत त्याच ठिकाणी भरती येते. भरती-ओहोटीचं रहाटगाडगं चालूच राहतं.

सूर्याचा प्रभाव

आता सवाल असा पडतो की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाची ओढ चंद्रापेक्षा जास्त आहे, मग त्यापायी भरती-ओहोटी का येत नाहीत? कारण सूर्यापासूनचं अंतर एवढं जास्त आहे की त्याच्याकडची बाजू आणि विरुद्ध बाजू यांच्यावरच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीत फारसा फरक पडत नाही. त्यामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती-ओहोटीच्या चक्रावर फारसा परिणाम होत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments