महासागरांच्या खोलीची निर्मिती
आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग सपाट नाही. तो अनेक भूखंडांचा बनलेला आहे. या भूखंडांनाच टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात. हे भूखंड स्थिर नसून ते सतत सरकत असतात. त्यामुळे जिथं असे दोन भूखंड एकमेकांना भिडतात तिथं तणावाची परिस्थिती निर्माण होते. भूखंडांच्या त्या टकरीपोटी एखादा भूखंड वर उचलला जातो. त्याचे उंच पर्वत बनतात. दुसरा एखादा भूखंड खाली ढकलला जातो. तिथं खोल विवरं निर्माण होतात. ती पाण्यानं भरली की तिथं खोल खोल महासागर बनतात.
महासागरांच्या खोलीतील विविधता
जशी सर्वच पर्वतांची उंची सारखी नाही. एव्हरेस्टसारखं एखादं शिखर उंचच उंच असतं. सह्याद्रीसारख्या पर्वतराजींची उंची त्याच्या पावपटच असते. महासागरांच्या खोलीचीही स्थिती वेगळी नाही. काही महासागर चांगलेच खोल आहेत, तर इतर काही उथळ आहेत. एवढंच काय, पण एखाद्या महासागराची खोलीही सगळीकडे सारखीच नसते. तिच्यातही चढउतार असतात. त्यामुळे महासागरांमधला सर्वात खोल प्रदेश कोणता आणि तो किती खोल आहे? असा प्रश्नच आपण विचारू शकतो.
मॅरियाना ट्रेंच: सर्वात खोल महासागर प्रदेश
प्रशांत महासागरातला ऑस्ट्रेलिया व पापुआ न्यूगिनीच्या उत्तरेला आणि फिलिपाईन्सच्या पूर्वेला असलेल्या मेरियाना बेटानजीकचा मॅरियाना ट्रेंच या नावानं ओळखला जाणारा प्रदेश सर्वात खोल आहे. १९५१ साली इंग्लंडच्या एका सर्वेक्षण जहाजानं त्याची खोली प्रथम मोजली. त्यामुळे त्या खोल भागाला ‘चॅलेंजर डीप’ या नावानं ओळखलं जातं. त्याची खोली तब्बल ११,०३३ मीटर आहे. म्हणजेच त्या जागी जर एव्हरेस्ट या जगातल्या सर्वात उंच शिखराला आणून ठेवलं तर त्याच्या माथ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची खोलीही दीड किलोमीटरपेक्षा जास्त भरेल.
वैज्ञानिक संशोधन आणि निष्कर्ष
इतक्या खोलावर अर्थात संपूर्ण निर्जीव प्रदेश असेल, अशी कल्पना होती; पण १९६० मध्ये अमेरिकन नौसैनिक जाक पिकार्ड आणि डोनाल्ड वॉल्श हे ‘प्रत्रिएस्त’ या जहाजातून तिथं पोहोचले. त्यानंतर बॅथीस्कोप नावाच्या एका उपकरणात शिरून ते त्या खोलीवर उतरले आणि त्यांनी त्या प्रदेशाचं सर्वेक्षण केलं. तिथं त्यांना अनेक पाणवनस्पती आणि सूक्ष्मजीवांचा संचार असलेला दिसून आला. त्यांच्या या मोहिमेतही त्या प्रदेशाची खोली मोजली गेली. त्यातूनच आता ११.०३ किलोमीटर ही महासागरांची सर्वात जास्त खोली आहे, हे सर्वमान्य झालं आहे.