Monday, December 23, 2024
HomeकुतूहलHow Pearls are formed : मोती कसे तयार होतात?

How Pearls are formed : मोती कसे तयार होतात?

मोती तयार होण्याची नैसर्गिक आणि कृत्रिम प्रक्रिया

आपले सारे अलंकार खनिजांपासून बनलेले असतात. सोनं, चांदी यासारखे धातू खनिजांमधूनच मिळतात आणि हिरे, माणकं यांच्यासारखी रत्नं म्हणजे तर खनिजंच. हिरा हा तर कोळशाचाच भाऊ. याला अपवाद म्हणजे मोती. हे आभूषण मात्र प्राणिज आहे. शिंपल्यांमध्ये असणाऱ्या कालवांपासून आपल्याला मोती मिळतात.

कालव्यांचा शिंपल्यांमधला प्रवास

कालवं द्विदल असतात. म्हणजे ती ज्या शिंपल्यात वावरतात त्यांची दोन पाळी असतात. ही दोन पाळी एकमेकांना चिकटलेली असली तरी त्यांचं तोंड उघडं असतं. आपलं खाद्य मिळवणं त्यामुळे कालवांना सहज शक्य होतं. ते मिळणारं अन्न खाऊन खाऊन जशी कालवांची वाढ होत राहते, तसंच मग त्यांचं घर असलेल्या शिंपल्याचीही वाढ व्हावी लागते. कालवांच्या शरीराचाच एक अवयव असलेल्या मॅन्टलकडे ही कामगिरी सोपवलेली असते.

नॅकर आणि मोत्याची निर्मिती (How Pearls are formed)

याच मॅन्टलकडून नॅकर नावाचा एक पदार्थ तयार केला जातो. शिंपल्याच्या आतल्या बाजूला जे चकचकीत अस्तर दिसतं ते या नॅकरचंच बनलेलं असतं. त्याला मदर ऑफ पर्ल, मोत्याची आई असंही म्हणतात. उघड्या तोंडातून कालवांचं खाणंच तेवढं आत शिरेल असं नाही. काही वेळा एखादा मातीचा कण किंवा असंच काहीतरी कुसळही आत शिरतं. मग त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मॅन्टलकडून नॅकरचा वाढीव पाझर होतो आणि त्या कणाला वेढून टाकतो. त्याच्यावर त्याचं आवरण बसत जातं. ते वाढत जाऊन मग त्याचाच मोती बनतो. म्हणून तर नॅकरला मोत्याची आई म्हणतात.

कल्चर्ड मोती

ही झाली मोती तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया. याचीच नक्कल करून कल्चर्ड मोती तयार केले जातात. वैज्ञानिक भाषेत कल्चर म्हणजे संवर्धन प्रक्रिया. म्हणून तर कृत्रिम पद्धतीनं वनस्पतींची रोपं बनवण्याच्या प्रक्रियेला प्लान्ट टिश्यू कल्चर म्हणतात.

संवर्धनाची प्रक्रिया

दही तयार करताना जे विरजण आपण घेतो तेही त्या दह्याच्या निर्मितीला चालना देणाऱ्या लॅक्टोबॅसिलस या जिवाणूंचं कल्चरच असतं. तेव्हा कल्चर्ड मोत्यांमध्ये अशीच संवर्धनाची प्रक्रिया वापरण्यासाठी त्या मॅन्टलला डिवचलं जातं व एखादा मातीचा कण शिंपल्याच्या आत सोडला जातो. डिवचलेल्या मॅन्टलला, हा आपोआप आत शिरलेला कोणी परकीय कण आहे की जाणूनबुजून आत शिरलेला घुसखोर आहे, याचा निवाडा करता येत नाही.

मोत्याची निर्मिती

ते त्या परकीयाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्याभोवती नॅकरचं जाळं विणून टाकतं आणि आपल्या पदरात मोत्याला टाकतं. आत टाकलेल्या कणाचा आकार हवा तसा निवडून मोठ्या आकाराचे कल्चर्ड मोती मिळवणं म्हणूनच शक्य होतं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments