Table of Contents
रामगोपाल अग्रवाल
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे लहानसे गाव होते. त्या गावात रामगोपाल अग्रवाल यांचा सराफचा व्यवसाय चालत होता. हा व्यवसाय खूप चांगला चालत होता. एके दिवशी त्यांनी आसामच्या दक्षिणेकडे ब्रह्मकुंडात स्नान करायचे ठरविले. आणि इच्छेप्रमाणे ९ ऑगस्ट १९९१ रोजी रामगोपाल हे ब्रह्मकुंडावर पोहोचले. सकाळी ब्रह्मकुंडाच्या काठाशी गेले असता त्यांना एक साधू दिसले. रामगोपाल यांनी त्यांना श्रद्धेने नमन केले आणि आशीर्वाद मागितले. त्या साधूने त्यांना आशीर्वाद देत एका शुभ्र कापडात गुंडाळलेले एक गाठोडे त्यांना सोपवली. हे गाठोडे दिसायला जरी भलेमोठे दिसत असले तरीही वजनाने हलके होते. ह्या गाठोड्यात नक्की काय आहे ह्याची उत्सुकता रामगोपाल ह्यांना लागली होती.
४३१ भूर्जपत्रे
रामगोपाल यांनी आपल्या मुक्कामी येऊन ते गाठोडे खोलून बघितले. गाठोडे खोलून बघितल्यावर त्यांच्या निदर्शनास आले कि ह्या गाठोड्यात जवळपास ४३१ भूर्जपत्रे होती. सदर भूर्जपत्रे त्यांनी वाचायचा प्रयन्त केला किंतु ती कोरी करकरीत होती. रामगोपाल यांना ती भूर्जपत्रे निरुपयोगी वाटली परंतु साधू महाराजांनी त्यांना ती भूर्जपत्रे श्रद्धेने दिली असल्याकारणाने त्यांना ती फेकावीशी सुद्धा वाटली नाही. पण साधू महाराजांनी त्यांना रिकामी कोरी भूर्जपत्रे का दिली ह्याचे कोडे त्यांना अजून सुटले नव्हते. रामगोपाल ह्यांनी हि भूर्जपत्रे श्रद्धेने दिली असल्याकारणामुळे त्यांनी ती देवघरात पूजेसाठी ठेवली.
अग्र भागवत (Agr Bhagavat)
एक दिवस रामगोपाल अग्रवाल पूजा करीत असताना चुकून पाण्याचे काही थेंब हे भूर्जपत्रावर पडले. पाणी भूर्जपत्रावर पडल्यावर मात्र चमत्कार झाला, जेवढ्या भागावर पाणी पडले होते तेवढ्या भागावर काही अक्षरे उमटून आली होती. हा चमत्कार बघता क्षणी रामगोपालजींनी एक अक्खे भूर्जपत्रे पाण्यात बुडवले. त्या भूर्जपत्रावर पाणी पडल्यावर त्या पत्रावरचा मजकूर अगदी स्पष्ट दिसू लागला. थोड्या वेळानंतर त्या भूर्जपत्रावरील पाणी वाळल्यानंतर ती अक्षरं वापस गायब झाली. हा चमत्कार बघितल्यानंतर रामगोपाल अग्रवाल यांनी सर्वांच्या सर्व म्हणजे ४३१ भूर्जपत्रे हि पाण्यात टाकली आणि ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचे ठरविले. त्या भूर्जपत्रावर लिहिलेला मजकूर हा देवनागरी लिपीत संस्कृत भाषेत लिहिण्यात आलेला होता. संस्कृत भाषेच्या जाणकरांकडून ह्या भूर्जपत्राचा अर्थ समजून घेण्यात आला असता असे लक्षात आले कि ह्या भूर्जपत्रावर अग्रसेन महाराजांचे अग्र भागवत (Agr Bhagavat) नावाचे चरित्र लिहिण्यात आले आहे.
महाराजा अग्रसेन
महाराजा अग्रसेन हे भारतीय इतिहासातील एक आदर्श सम्राट म्हणून ओळखले जातात, ज्यांचा जन्म त्रेतायुगात झाला आणि भगवान श्री रामाचे वंशज म्हणून त्यांना ओळखले जाते. वैश्य समाजाची उन्नती आणि समता आणि न्याय वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अग्रवाल समाजाचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत शांतता, न्याय आणि सद्गुण यावर भर दिला. त्यांच्या “एक रुपया, एक वीट” उपक्रमाचा उद्देश त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला आधार देणे, नाविन्यपूर्णतेला चालना देणे आणि सामाजिक सौहार्द आणि आर्थिक वाढीकडे नेणारा होता. अहिंसेचे पुरस्कर्ते, त्यांनी आपल्या राज्यात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घातली. त्यांच्या आदर्शांचा अग्रवाल समाजावर आजतागायत प्रभाव पडत आहे. रामगोपाल यांना भेटलेले अग्र भागवत हे राजा अग्रसेन ह्यांच्यावर अदृश्य शाईने लिहिले होते.
अदृश शाई
सदर गोष्टीवरून असे लक्षात येते कि हजारो वर्षांपूर्वी भारताकडे अदृश्य शाईने लिहिण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. अदृश्य शाई म्हणजे अशी शाई जी साध्या डोळ्यांनी दिसत नाही. एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्या शाईचा निर्माण करण्यात आला असावा. गुप्तचरामार्फत संदेश पोहोचविणे अथवा एकदाही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी ह्याचा वापर करण्यात आला असावा. सदर शाईच्या साहाय्याने भूर्जपत्रावर संदेश लिहून संदेशाची देवाणघेवाण कदाचित त्या प्राचीन काळात करण्यात येत होती.
भूर्जपत्रे
भूर्जपत्रे हि हिमालयात बेट्युला वंशातील भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवली जातात. ह्या साली काढून सोलून व त्यांना तेलाने गुळगुळीत करून त्यांचे पत्रे तयार त्यावर शाईने लिहिलेले जाई. एक पृष्ठ लिहून झाले तर त्या पृष्ठास (पत्रास) भोक मारून दोरी ओवून भूर्जपत्राची पोथी बनवली जायची. चांगल्या दर्जाची भूर्जपत्रे हि जवळपास २००० वर्षे देखील टिकू शकतात. ह्या भूर्जपत्रावर लिहिण्यासाठी शाईचा उपयोग व्हायचा.
शाई बनवायची पारंपरिक पद्धत
भूर्जपत्रावर लिहिण्यासाठी जी शाई वापरण्यात यायची ती बदामाच्या साली व कोळसा यांच्या पासून किंवा जाळलेला भात गोमूत्रात उकळून तयार केला जायचा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या शाईच्या सहाय्याने जर भूर्जपत्रावर लिहिले आणि त्या त्याच्यावर पाणी पडले तर शाई दिसेनाशी होते. किंतु अग्र भागवत ग्रंथात वापरलेली शाई पाण्याच्या सानिध्यात स्पष्ट होते. दुर्देवाने आज ह्या शाईचे तेव्हा वापरलेले तंत्रज्ञान आपल्याला अवगत नाही.
ता.क. – संदर्भासाठी लेखक प्रशांत पोळ ह्यांच्या भारतीय ज्ञानाचा खजिना ह्याची मदत घेण्यात आली आहे.