Monday, December 23, 2024
HomeकुतूहलHow airplanes avoid lightning strikes : विमानांवर वीज का कोसळत...

How airplanes avoid lightning strikes : विमानांवर वीज का कोसळत नाही?

वीज कोसळण्याच्या धोक्याचं कारण

दरवर्षी पावसाळ्यात आपण, कुठंतरी वीज कोसळून झाड जळून गेल्याच्या किंवा टेलिफोनचे खांब उन्मळून पडल्याच्या बातम्या वाचत असतो. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या चौपाटीवर पावसाची मजा लुटायला गेलेल्या एका मुलीच्या कानाला लावलेल्या मोबाईलवर वीज कोसळली आणि त्यात त्या मुलीचा अंतही झाला. आकाशातल्या ढगांवर आरूढ झालेल्या त्या विजेपासून काही किलोमीटर अंतरावरच्या जमिनीवरच्या वस्तूंची ही अवस्था, तर मग त्या ढगांमधूनच वाटचाल करणाऱ्या विमानांना त्या विजेपासून किती धोका असेल? असा प्रश्न आपल्याला पडला नाही तरच नवल.

विमानांना वीजेपासून सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा (How airplanes avoid lightning strikes?)

आजवर १९६७ साली एका विमानाच्या इंधनाच्या टाकीवरच वीज कोसळल्यानं त्या टाकीचा स्फोट झाला आणि अर्थातच ते विमानही कोसळलं; पण आजमितीला कोणत्याही क्षणी हजारो विमानं जगभर आकाशात उडत असताना अशी दुर्घटना परत झालेली नाही. याचं कारण, विजेच्या लोळापासून बचाव करण्याची व्यवस्था विमानांमध्ये केलेली असते.

हवामान माहिती आणि पायलटची काळजी

विमानाच्या पायलटला सतत हवामानासंबंधीची माहिती पुरवली जात असते. त्यामुळे जिथल्या ढगांवर मोठ्या प्रमाणात विद्युत्‌भार साचलेला आहे आणि त्याचा निचरा करण्यासाठी तिथं वीज कोसळण्याची शक्यता आहे, अशा भागातून जाताना त्या विद्युत्‌भारांच्या कचाट्यात आपण सापडणार नाही याची काळजी पायलट घेत असतो.

विमानाच्या संरचनेतून विजेचा प्रवाह

विमानाचं सर्वात बाहेरचं आवरण अॅल्युमिनियमचं बनलेलं असतं. हा धातू विद्युत्वाहक आहे. त्यामुळे जर विजेचा संपर्क आला तर ती वीज त्या आवरणातच फिरून बाहेर निघून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तिची संक्रांत आतल्या प्रवाशांच्या दिशेनं वळत नाही. सहसा विजेचा लोळ येतो तो विमानाच्या नाकाकडे किंवा पंखांच्या टोकाकडे. तिथून मग तो विमानाच्या कातडीतून विहरत विहरत शेपटातून बाहेर निघून जातो, त्यामुळे विमानाला धक्का पोहोचत नाही.

स्टॅटिक विक आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण

आधुनिक विमानांवर स्टॅटिक विक नावाची एक धातूची वात बसवलेली असते. ही विद्युत्यंत्रणेद्वारे विमानाच्या कातडीला जोडलेली असते. या वातीवर काही धातूचेच काटे असतात. ते विजेच्या लोळाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतात. तिथं पोहोचलेला लोळ त्या काट्यांमधून वातीत आणि वातीमधून विमानाच्या कातडीत शिरून बाहेर निघून जातो. शिवाय आतल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर त्या विजेपासून बचाव करणारं कवच असल्यामुळे त्यातही काही बिघाड होत नाही. विमान सुरळीत पुढे जातं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments