Monday, December 23, 2024
HomeकुतूहलHow crude oil is Purified : तेल शुद्ध कसं करतात?

How crude oil is Purified : तेल शुद्ध कसं करतात?

कच्च्या तेलाचं शुद्धीकरण (How crude oil is Purified?)

तेलविहिरीतून मिळणाऱ्या खनिज तेलाला कच्चं तेल म्हणतात. पुरातन काळी तिथं साचून राहिलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांवर पडलेल्या दाबापोटी त्यांचं या तेलात रूपांतर झालेलं असतं. अवशेष कोणत्या प्रकारचे होते, ते किती प्राचीन आहेत, त्यांच्यावर किती दाब पडला होता आणि जिथं ते होते तिथलं स्थानिक पर्यावरण यावर त्या तेलाचे गुणधर्म अवलंबून असतात. तरीही साधारणपणे हे कच्चं खनिज तेल दाट आणि काळसर रंगाचं असतं.

शुद्धीकरणाची गरज

पण आपण मोटारीत भरतो ते पेट्रोल किंवा डिझेल किंवा स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारं घासलेट किंवा केरोसीन हे त्या मानानं पातळ आणि नितळही असतं. याचं कारण म्हणजे, कच्च्या तेलावर अनेक टप्प्यांची शुद्धीकरण प्रक्रिया करून हे उत्पादन मिळवलेलं असतं.

कच्च्या तेलातील हायड्रोकार्बन

खनिज तेलामध्ये अनेक प्रकारचे हायड्रोकार्बन या गटात मोडणाऱ्या रसायनांचा समावेश असतो. या हायड्रोकार्बन रसायनांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा दडलेली असल्यामुळे त्यांचा वापर अनेक प्रकारच्या उपयुक्त उत्पादनांसाठी केला जातो. कच्च्या तेलापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन तर मिळतातच; पण वंगणं, नॅफ्था, मेण, प्लास्टिक, पॉलिएस्टर, डांबर, खतांसाठी वापरली जाणारी पेट्रोरसायन, कृत्रिम धागे आणि इतर बरेच पदार्थ मिळतात. या सर्वांसाठी कच्च्या तेलात असणाऱ्या निरनिराळ्या घटकांना अलग करून प्रत्येक पदार्थ शुद्ध रूपात मिळवण्याची आवश्यकता असते.

शुद्धीकरण प्रक्रिया

या शुद्धीकरणासाठी मुख्यत्वे दोन प्रकारच्या प्रक्रिया अवलंबल्या जातात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि केमिकल कन्व्हर्जन. निरनिराळ्या घटकांचा उत्कलन बिंदू वेगवेगळा असतो. निरनिराळ्या तापमानाला हे घटक उकळतात. त्यांचा वापर करून उर्ध्वपातनाच्या प्रक्रियेनं तो घटक वेगळा केला जातो. त्या घटकाला उकळी आली की त्याची वाफ होते. ती एका नळीतून नेऊन थंड केली जाते व तिचं परत द्रवात रूपांतर केलं जातं. कच्चं तेल हळूहळू तापवत निरनिराळे घटक वेगळे केले जातात.

रासायनिक प्रक्रिया

पण अशा तऱ्हेनं वेगळे झालेले सर्वच घटक तसेच्या तसे उपयुक्त असतातच असं नाही. त्यामुळे त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचं उपयुक्त पदार्थांमध्ये रूपांतर करावं लागतं. यासाठी मुख्यत्वे तीन प्रक्रियांचा वापर केला जातो. क्रॅकिंगच्या प्रक्रियेत हायड्रोकार्बनच्या लांब साखळ्या तोडून त्यांचं लहान साखळीच्या हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर केलं जातं. उलटपक्षी काही वेळा एकाहून अधिक लहान साखळ्या जोडून लांब साखळीचे हायड्रोकार्बन तयार करावे लागतात. यासाठी युनिफिकेशन प्रक्रियेचा वापर होतो. आल्टरेशनच्या प्रक्रियेत रासायनिक प्रक्रिया करून एका हायड्रोकार्बनचं दुसऱ्याच प्रकारच्या रसायनात रूपांतर केलं जातं.

तेल शुद्धीकरण कारखान्यांचा महत्त्व

तिन्ही प्रकारच्या रासायनिक रूपांतर प्रक्रियांमध्ये वितंचकांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तेल शुद्धीकरण कारखान्यांमध्ये या सर्व प्रकारच्या प्रक्रिया निरनिराळ्या खात्यांमध्ये पार पाडल्या जातात. त्यातून इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या तेलांबरोबर, ज्वलनशील वायूंची आणि इतर उत्पादनांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती होत असते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments