Monday, December 23, 2024
HomeकुतूहलHow People Walk on Burning Coals : लोक धगधगत्या निखाऱ्यांवरून कसे चालतात

How People Walk on Burning Coals : लोक धगधगत्या निखाऱ्यांवरून कसे चालतात

परंपरेतल्या अग्निपरीक्षेचं वैज्ञानिक रहस्य

गावोगावी जत्रा भरतात. काही तिथल्या ग्रामदैवतांच्या वार्षिक उत्सवाच्या असतात. यापैकी काही जत्रांमध्ये मातीत एक खड्डा करून त्यात होळीसारखी आग पेटवतात; आणि ती धुमसून तिचे निखारे झाले की त्यावरून मग काही लोक अनवाणी पायांनी चालत जातात (How People walk on Burning Coals). देवाधर्मावर ज्यांची श्रद्धा आहे अशा कोणालाही हे शक्य असल्याचं सांगितलं जातं. भाविक बायाबापड्यांचा त्यावर विश्वासही बसतो; पण एरवी कोणत्याही विवेकी माणसाला प्रश्न पडतोच – त्या तापलेल्या धगधगत्या निखाऱ्यावरून पाय भाजून न घेता ही मंडळी कशी काय चालून जाऊ शकतात ?

श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा सहभाग

खरं पाहिलं तर यात श्रद्धा-अश्रद्धेचा कोणताही सहभाग नसतो. भौतिकशास्त्रातल्या काही तत्त्वांचा विचार करता, ही करामत कशी काय साध्य केली जाऊ शकते याचा उलगडा होतो. साधारणपणे त्या निखाऱ्यांवरून चालण्यापूर्वी पाय व्यवस्थित धुवायला सांगितलं जातं. त्यामुळे पाय चांगले ओले राहून तळपायावर पाण्याचा पापुद्रा चिकटून राहतो.

भौतिकशास्त्राचा आधार

आगीवर चालायला लागलं की त्या निखाऱ्यांच्या उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेचं एक कवचच मग तळपायाभोवती राहतं. अशी वाफ उष्णतेची वाहक नसते. त्यामुळे खालच्या आगीच्या उष्णतेची झळ पायांपर्यंत पोहोचत नाही. शिवाय त्या आगीवरून चालताना कोणीही रमतगमत चालत नाही. झपझप चालत राहतं. त्यामुळे तळपाय निखाऱ्यांवर जितका वेळ राहतात त्यापेक्षा जास्त वेळ ते हवेत राहतात. उष्णतेपासून दूर असतात.

निखाऱ्यांवर चालण्याचा वेळ

झपझप चालण्यामुळे निखाऱ्यांवर घालवायचा एकूण काळही कमी असतो. तेवढा वेळ ते वाफेचं कवच तळपायांना संरक्षण देण्यास पुरेसं होतं. सिनेमात कित्येक वेळा आगीतून जाण्यापूर्वी नायक डोक्या-तोंडाभवती ओला, ज्यातून पाणी निथळत आहे असा पिळा गुंडाळून घेताना दाखवतात. त्यापाठीही हेच तत्त्व असतं. आगीतून जाताना त्या पाण्याची वाफ होते आणि ती त्या कापडाभोवती घोटाळत राहते. तिच्यातून आगीची धग कातडीपर्यंत पोहोचत नाही. साहजिकच तो नायक त्या आगीतून धावत जाऊ शकतो.

भौतिकशास्त्राची किमया

सगळी भौतिकशास्त्राची किमया असताना आपण मात्र, त्या नायकानं कशी धमाल केली म्हणून त्याला देतो. तळपायावर पाण्याचा पापुद्रा आणि वाफेचं कवच, झपझप चालण्याची वेगवान पद्धत आणि पाण्याचं वाफ होणं – या सर्व गोष्टी मिळून या अग्निपरीक्षेचं रहस्य उलगडतात. त्यामुळेच, श्रद्धा-अश्रद्धेचा कोणताही संबंध नसताना या मंडळींनी धगधगत्या निखाऱ्यांवरून पाय भाजून न घेता चालू शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments