इतिहास हा एक अद्भुत आणि आकर्षक विषय आहे. इतिहासाचा शोध घेताना, अनेकदा आपण अशा ठिकाणी येतो की, ज्यामुळे मन चकित होते, हे इतकं प्रगत ज्ञान दीड हजार वर्षांपूर्वी असू शकतं यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.
सोमनाथ मंदिराचा महान इतिहास
गुजरातच्या सोमनाथ मंदिराजवळ आल्यावर अशीच भावना मनात दाटून येते. सोमनाथ मंदिराचा इतिहास अत्यंत अद्भुत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक दैदिप्यमान आणि समृद्ध शिवलिंग आहे. या मंदिराचे वैभव इतके अपार आहे की उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचे लक्ष सोमनाथकडे गेले आणि अनेक वेळा सोमनाथ लुटले गेले. सोनं, चांदी, हिरे, माणके, रत्नं या सर्व संपत्तीची लूट होऊनही, दरवेळी सोमनाथचे शिवालय नव्या जोमानं उभे राहायचे.
परंतु सोमनाथ मंदिर केवळ या वैभवासाठीच महत्त्वाचे नाही. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर अरबी समुद्राच्या विशाल लाटांमुळे पादप्रक्षालन केले जाते. हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात कधीही या सागराने सोमनाथाला हानी पोहोचवली नाही. कोणत्याही वादळामुळे हे मंदिर कधीही उद्ध्वस्त झाले नाही.
बाणस्तंभाचे रहस्य
सोमनाथ मंदिराच्या आवारात एक विशिष्ट स्तंभ आहे, जो ‘बाणस्तंभ’ म्हणून ओळखला जातो (Banasthambh). हा स्तंभ कधीपासून या ठिकाणी आहे, हे ठामपणे सांगणं अवघड आहे. इतिहासाच्या मागोव्यात आपण सहाव्या शतकापर्यंत पोहोचतो, जिथे ह्या बाणस्तंभाचा उल्लेख सापडतो. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की हा स्तंभ सहाव्या शतकात उभारला गेला आहे. याचा खरा वयोमान ठरवणं कठीण आहे.
हा बाणस्तंभ दिशादर्शक म्हणून ओळखला जातो. या स्तंभावर एक बाण उभारला आहे आणि त्यावर कोरलेली ओळ आहे:
‘आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’
याचा अर्थ असा होतो की, या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. म्हणजेच, या मार्गात एकही जमिनीचा तुकडा येत नाही.
प्रथमदर्शनी हा शिलालेख वाचून मनात विचार आला की, इतक्या प्राचीन काळात हे ज्ञान असणं कसं शक्य आहे? हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. या संस्कृत ओळीच्या अर्थामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. या ओळीचा सरळ अर्थ आहे की, सोमनाथ मंदिराच्या या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत एक सरळ रेष काढली तर मध्ये एकही भूखंड येत नाही.
आता हे सत्य कशावरून?
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सत्य पडताळणं सोपं आहे. या मार्गावर 10 किमी X 10 किमी चा एकही भूखंड लागत नाही, यावरून असे म्हणता येईल की, संस्कृत श्लोकातील माहिती खरी आहे.
पण खरा प्रश्न तसाच राहतो, हा बाणस्तंभ उभारण्याच्या काळात भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे कसं माहीत होतं? हे ज्ञान इतक्या प्राचीन काळात असणं हे आश्चर्यकारक आहे.प्राचीन काळात मानवाला एवढे प्रगत तंत्रज्ञान अवगत होते का? त्याने तेवढी प्रगती केली होती का? सदर प्रश्नांची उत्तर अजूनही उलगडण्यात न आल्यामुळे गूढ कायम आहे.