पुराणातील उल्लेख आणि ऐतिहासिक संदर्भ
जगातील सर्वात पहिलं किंवा सर्वात जुनं फळ कोणतं? पुराणग्रंथांमध्ये अशा झाडांचा उल्लेख आहे ज्यांचा ऐतिहासिक संदर्भ घेतला जाऊ शकतो. महाभारतात शमीच्या झाडावर पांडवांनी आपली अस्त्रं लपवल्याची आख्यायिका आहे. रामायणात अशोकवनाचा उल्लेख आहे, ज्यामुळे अशोकाचं झाड प्राचीन असल्याचं मानलं जातं. पण आधुनिक मानवाच्या उदयाच्या काळाचा विचार केला तर, आदाम आणि ईव्ह यांच्या दंतकथेत अंजिराच्या पानांचा वापर केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे, या प्रश्नाचं उत्तर अंजिराचं झाड असं द्यावं लागेल. (The Oldest Fruit Fig Tree)
मानवी शेतीचा उगम आणि अंजिराचं झाड
अंजिराचं झाड हे मानवाने प्रथम लागवड केलेल्या झाडांपैकी एक असल्याचं निःसंदिग्ध पुराव्यांवरून दिसून आलं आहे. टायग्रिस आणि युफ्राटिस नद्यांच्या दोआबात आणि भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यानजीकच्या परिसरात अंजिराचं झाडाच्या पूर्वकालीन लागवडीचे पुरावे सापडतात.
फळ आणि फूल: अंजिराचं अनोखं वैशिष्ट्य
सहसा फळझाडांवर आधी फूल येतं, परंतु अंजिराचं झाड याला अपवाद आहे. अंजिराला मिथ्यफळ म्हटलं जातं, कारण जे आपण फळ समजतो ते प्रत्यक्षात फळ नसून फूल आणि बिया यांची वाढ होत असलेला कोश असतो. वैज्ञानिक भाषेत याला इनफ्रुक्टिसन्स म्हणतात. काही जण याला संयुक्त फळही मानतात, कारण या फळाच्या आत असंख्य फुलं असतात आणि त्यांच्या टोकाला लहान लहान खसखशीच्या आकाराच्या बिया असतात.