जर मी तुम्हाला विचारले कि आता तुमच्या घड्याळात किती वाजले तर तुम्ही छातीठोकपणे घड्याळात बघून वेळ सांगू शकता.तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यावरून वेळ हि ठरत असते, आणि प्रत्येक ठिकाणी हि वेळ वेगवेगळी असेल. उदाहरण द्यायचे म्हणजे जर मुंबई मध्ये आता दुपारचे बारा वाजले असतील तर ह्याचा अर्थ हा होत नाही कि लंडन मध्ये देखील दुपारचे १२ वाजले असतील.
आता विचार करा तुमच्या अमेरिकेत स्थित मित्राने तुम्हाला सांगितले कि आपण सकाळचे १० वाजता फोनवर बोलू तर तुम्हीच गोंधळून जाल कि मुंबईच्या १० वाजता तुम्हाला बोलायचे कि अमेरिकेच्या १० वाजता. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईनच्या सांगण्यानुसार आपण चार मिती असलेल्या जगात राहत आहोंत, त्यामुळे लांबी, रुंदी आणि उंची या परिमितींना काळाचीही जोड द्यायला हवी. त्यामुळे फक्त सकाळचे १० वाजता सांगून तुमची फोनभेट होऊ शकेल का? त्याची शक्यता कमीच आहे, कारण सकाळचे कुणाचे १० असा प्रश्न तुमच्या समोर उभा राहील.
असा घोटाळा वैमानिक, नाविक अथवा खगोलशास्त्रज्ञांना परवडणारा नाही. त्यामुळे जसे जग जवळ येऊ लागले तसे काळ पद्धत देखील प्रमाणित करण्याची गरज भासू लागली. त्यामुळेच जागतिक परिषद भरून त्यात जागतिक प्रमाणवेळ म्हणजेच युनिव्हर्सल टाइम हि संकल्पना मान्य करण्यात आली. ह्या प्रमाणवेळेसाठी संदर्भस्थान म्हणून लंडनजवळील ग्रीनविच हे ठिकाण निवडले गेले.
ह्याच प्रणालीला ग्रीनविच प्रमाणवेळ असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय परिषदेने हि संकल्पना मान्य केल्यावर ग्रीनविच येथील प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळ मानली जाऊ लागली (Greenwich Mean Time aka GMT time) आणि सर्व जगाची घड्याळातील २४ तासाप्रमाणे २४ कालखंडात विभागणी करून त्या विभागातील प्रमाणवेळ ग्रीनविच जागतिक प्रमाणवेळेशी जोडली गेली. त्यानुसार जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणची प्रमाणवेळ हि ग्रीनविच वेळेच्या काही तास पुढं किंवा काही तास मागे अशी ठरली आहे. उदा. भारत ग्रीनविचच्या पूर्वेला असल्यामुळे भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या साडेपाच तास पुढे आहे आणि त्यालाच आपण ग्रीनविच मिन टाइम +०५.३० असे दर्शवितो.