तापमान आणि त्याचे मोजमाप
तापमान हे उष्णता मोजण्याचं एक साधन आहे. जितकी उष्णता जास्त तितकं तापमान जास्त असं आपण साधारणपणे म्हणू शकतो. कोणत्याही पदार्थाची उष्णता ही त्याच्या गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. पदार्थ स्थिर असला तरी त्याचे अणू एका जागी न थांबता सतत हालचाल करत असतात, ज्यामुळे त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा मोजूनच पदार्थाचं तापमान ठरवलं जातं.
तापमानातील बदल कसे घडतात?
जेव्हा एखाद्या पदार्थाला बाहेरून उष्णता दिली जाते, तेव्हा त्याचे अणू अधिक गतिमान होतात आणि त्याचं तापमान वाढत जाते. या उलट, जर अणूंच्या आंदोलनांवर निर्बंध आले आणि अंतर्गत गतिज ऊर्जा कमी झाली, तर तापमान घटतं. पदार्थ गोठला तरीही त्याच्या अणूंची हालचाल पूर्णपणे थांबत नाहीत. ती हालचाल संपूर्णपणे थांबली की, गतिज ऊर्जा शून्यवत होते आणि त्याचं तापमान किमान पातळीला पोहोचतं.
किमान तापमान म्हणजे काय? What is absolute zero temperature?
लॉर्ड केल्विन या वैज्ञानिकाने सिद्ध केले की, उणे २७३ अंश सेल्सियस (शून्य केल्विन) तापमानाला अणूंची हालचाल संपूर्णपणे थांबते आणि गतिज ऊर्जा शून्यवत होते. यामुळे, हे विश्वातील किमान तापमान मानलं जातं.