दिनमानाचे विभाजन
दिवसाची सुरुवात कुठे होते जा प्रश्न जरी साधा सोपा वाटत असला तरी ह्या प्रश्नाचे उत्तर जटील आहे. कारण जगभरात प्रत्येक देशाच्या त्याच्या निरनिराळ्या प्रमाण वेळ आहे. तसेच अमेरिकेसारख्या देशात चार चार प्रमाणवेळा आहेत. त्यामुळे नव्या दिवसाची सुरुवात कधी होते ह्यावर एकमताने विधान करणे कठीण आहे.
विविध संस्कृतींमधील दिवसाची सुरुवात
दुसरी बाब म्हणजे, प्रत्येक संस्कृतीत दिवस कधी सुरु होतो ह्याच्या निरनिराळ्या व्याख्या आहेत, पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः ख्रिस्ती धर्मीयांमध्ये, दिवसाची सुरुवात मध्यरात्री होते असे मानले जाते. जागतिक हवाई वाहतुकीतही हीच व्याख्या प्रमाण मानली जाते. परंतु, भारतीय व हिंदू परंपरेनुसार, नव्या दिवसाची सुरुवात सूर्योदयाच्या वेळी होते. आपल्या पंचांगातही हीच व्याख्या वापरली जाते. इस्लाम आणि ज्यू धर्मीय मात्र दिवसाची सुरुवात सूर्यास्ताच्या वेळी मानतात.
ग्लोबल व स्थानिक सुरुवात
जागतिक प्रमाणवेळ आणि पाश्चिमात्य संस्कृतीनुसार ग्रीनिच येथे शून्य अंश रेखांशावर नव्या दिवसाची सुरुवात होते असे मानले जाते. परंतु, सूर्योदयाची सुरुवात मोजायची झाल्यास आंतरराष्ट्रीय वाररेषेवर म्हणजे ग्रीनिचच्या विरुद्ध दिशेला १८० अंश रेखांशावर नवा दिवस उजाडतो असे समजले जाते.
पण पाश्चिमात्य संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती यांचा मेळ घालायचा तर ज्या वेळी ग्रीनिच इथं मध्यरात्र होते त्या वेळी जिथं सूर्योदय होतो ते ठिकाण नव्या दिवसाची सुरुवात पाहणारं असेल. ज्या वेळी ग्रीनिच इथं रात्रीचे बारा वाजलेले असतात त्या वेळी निकोबार बेटांवर सूर्याची पहिली किरणं दबकत दबकत प्रवेश करतात. तेव्हा नव्या दिवसाची सुरुवात भारताच्या आग्नेयेला निकोबार बेटांवर होते असं आपण म्हणू शकतो. अर्थात या ठिकाणाच्या रेखांशाची व्याप्ती तशी बरीच आहे. कारण तो रेखांश निकोबारच्या उत्तरेला म्यानमार, थायलंडवरून पार चीन, मंगोलिया आणि सायबेरियापर्यंत पसरलेला आहे. तेव्हा त्या सर्व ठिकाणी दिवसाची सुरुवात होते असं म्हणता येईल. (Where does the day begin?)
(संदर्भ – मनोविकास प्रकाशित डॉ. बाळ फोंडके लिखित “कुठे” पुस्तक.)